डॉ. गिरीश ओक यांचे हे पुस्तक म्हणजे केवळ एका नटाचे स्मरणरंजन नाही, तर हा एक कॅलिडोस्कोप आहे. तो थोडासा फिरवला, की नक्षी बदलते. त्याचप्रमाणे या पुस्तकात वाचकांना कधी नामवंत रंगकर्मीचा परिचय घडतो, तर कधी व्यावसायिक नाटकं प्रेक्षकांपर्यंत नेताना करावी लागणारी धडपड दिसते, तर कधी पडद्यामागे घडणाऱ्या गमतीजमतींचे दर्शन होते. रंगभूमीवर सातत्याने क्रियाशील असणाऱ्या एका सजग अभिनेत्याने स्वतःच्या नाट्यप्रवासाचे तटस्थ दृष्टीने केलेले हे अवलोकन आहे. हा निव्वळ स्वकर्तृत्वाचा मांडलेला लेखाजोखा नाही तर मराठी रंगभूमीच्या इतिहासातील काळाच्या एका तुकड्याचा रसरशीत इंद्रधनुषी अंश आहे.