“या ग्रंथाचा मुख्य उद्देश असा आहे कीं, आज शेंकडों वर्षे शूद्रादि अतिशूद्र, ब्राह्मण लोकांचें राज्य झाल्यापासून सतत दुःखें सोशीत आहेत व नानाप्रकारच्या यातनेंत आणि संकटांत दिवस काढीत आहेत, तर या गोष्टीकडे त्या सर्वांचे लक्ष लागून त्यांनीं तिजविषयीं नीट विचार करणें व येथून पुढें भटब्राह्मण लोकांचें अन्यायी जुलमापासून आपली सुटका कशी करून घेणें हाच काय तो आहे.
ते लोक परकीय देशांतून येऊन या देशांतील मूळचे राहणारे लोकांस जिंकून त्या सर्वांस त्यांनी आपले दास केले व त्यांस अनेक तऱ्हेचीं क्रूर शासनें दिलीं. पुढे कांहीं काळानंतर त्या लोकांस या गोष्टीचें विस्मरण झालेसें पाहून भट लोकांनी परकीय देशांतून ये... See more
“या ग्रंथाचा मुख्य उद्देश असा आहे कीं, आज शेंकडों वर्षे शूद्रादि अतिशूद्र, ब्राह्मण लोकांचें राज्य झाल्यापासून सतत दुःखें सोशीत आहेत व नानाप्रकारच्या यातनेंत आणि संकटांत दिवस काढीत आहेत, तर या गोष्टीकडे त्या सर्वांचे लक्ष लागून त्यांनीं तिजविषयीं नीट विचार करणें व येथून पुढें भटब्राह्मण लोकांचें अन्यायी जुलमापासून आपली सुटका कशी करून घेणें हाच काय तो आहे.
ते लोक परकीय देशांतून येऊन या देशांतील मूळचे राहणारे लोकांस जिंकून त्या सर्वांस त्यांनी आपले दास केले व त्यांस अनेक तऱ्हेचीं क्रूर शासनें दिलीं. पुढे कांहीं काळानंतर त्या लोकांस या गोष्टीचें विस्मरण झालेसें पाहून भट लोकांनी परकीय देशांतून येऊन या देशांतील मूळचे लोकांस जिंकून त्यांस दास केल्याचें मुळींच छपवून ठेविलें. त्या लोकांनी आपली वजनदारी ह्या लोकांचे मनावर बसवावी याजकरितां जेणेकरून आपले मात्र हित होईल असे नानाप्रकारचे उपाय योजले व ते सर्व सिद्धीस जात गेले.
इंग्रज लोकांनी तर पुष्कळ ठिकाणीं इतिहास वगैरे ग्रंथांत भट लोकांनी स्वहितास्तव इतर लोक, म्हणजे, शूद्रादि अतिशूद्र लोक ह्यांस आपले गुलाम करून टाकिलें आहे, असें संमत दिलेलेंच आहे.
या देशात इंग्रज सरकार आल्यामुळें शूद्रादि अतिशूद्र भटाच्या कायिक दास्यत्वापासून मुक्त झाले खरे, परंतु आम्हांस सांगण्यास मोठें दुःख वाटतें कीं, अद्यापि आमचे दयाळू सरकारचे शूद्रादि अतिशूद्रांस विद्या देण्याविषयीं दुर्लक्ष असल्यामुळें ते अज्ञानी राहून भट लोकांचे बनावट ग्रंथांच्या संबंधानें त्यांचे मानसिक दास झालेले आहेत व त्यांस सरकारजवळ दाद मागण्याचें त्राण राहिलें नाहीं. भट लोक त्या सर्वांस प्रापंचिक सरकारी कामांत किती लुटून खातात, याजकडेस आमचे सरकारचें मुळींच लक्ष पोंहचलें नाहीं, तर त्यांनीं दयाळू होऊन या गोष्टीकडेस नीट रीतीनें लक्ष पुरवावें व त्यांस भट लोकांचे मानसिक दास्यत्वापासून मुक्त करावें अशी आम्हीं आपले जगन्नियंत्याजवळ शेवटली प्रार्थना करितों."
१ जून १८७३
जो. गो.