ज्योतिष हे एक विशेष शास्त्र आहे पण अनेकांना ती गूढ विद्या वाटते. ज्योतिष शास्त्रामधील अनेक तत्त्वे योग्य पद्धतीने विशद न केल्यामुळे असे झाले असावे. जेव्हा आपल्याला तत्त्वांचे मूळ माहीत असते तेव्हा ते तत्त्व समजून घेणे आणि त्याचा उपयोग करणे या दोन्ही गोष्टी सोप्या व अचूक होतात. अनेकदा ज्योतिषशास्त्र विविध नियमांच्या माध्यमातून शिकवले जाते. पण जेव्हा आपण हे नियम वापरतो तेव्हा ते लागू पडतातच असे नाही. यामुळे आपण आपल्या क्षमतेवर शंका घेऊ शकतो. ज्योतिष शास्त्राचे प्रामाणिक विद्यार्थी म्हणून आपण अनेकदा भावांची कारकत्त्वे कशी ठरवली असतील याचा विचार करतो. ग्रह आणि राशींची कारकत्त्वे कशी ठरवली असतील अस�... See more
ज्योतिष हे एक विशेष शास्त्र आहे पण अनेकांना ती गूढ विद्या वाटते. ज्योतिष शास्त्रामधील अनेक तत्त्वे योग्य पद्धतीने विशद न केल्यामुळे असे झाले असावे. जेव्हा आपल्याला तत्त्वांचे मूळ माहीत असते तेव्हा ते तत्त्व समजून घेणे आणि त्याचा उपयोग करणे या दोन्ही गोष्टी सोप्या व अचूक होतात. अनेकदा ज्योतिषशास्त्र विविध नियमांच्या माध्यमातून शिकवले जाते. पण जेव्हा आपण हे नियम वापरतो तेव्हा ते लागू पडतातच असे नाही. यामुळे आपण आपल्या क्षमतेवर शंका घेऊ शकतो. ज्योतिष शास्त्राचे प्रामाणिक विद्यार्थी म्हणून आपण अनेकदा भावांची कारकत्त्वे कशी ठरवली असतील याचा विचार करतो. ग्रह आणि राशींची कारकत्त्वे कशी ठरवली असतील असा प्रश्न सुद्धा आपल्याला पडतो. याबद्दल विविध विचारधारा आहेत आणि यातील काही विचारधारा आपल्याला माहीत असतीलही. सामान्यपणे अनेक विचारधारा तार्किक विचार मांडतात. पण या तार्किक विचारधारा सर्व ठिकाणी उपयोगात आणता येतातच असे नाही. मी या पुस्तकामध्ये ही सर्व तत्त्वे इतर शास्त्रांच्या आधारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याकरिता मी वैद्यकशास्त्र, जीवशास्त्र, मानसशास्त्र, Quantum Physics व खगोलशास्त्र या शास्त्रांचा आधार घेतला आहे. ज्योतिष शास्त्रातील अनेक प्रश्नांची उत्तरे मी गेली ३० वर्षे शोधत आहे आणि हे शास्त्र निर्माण कसे झाले असेल हा माझ्या मनातील मुख्य प्रश्न आहे. यातील अनेक प्रश्नांची उत्तरे मला सापडली आहेत आणि इतर शास्त्रांप्रमाणे अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्या प्रश्नांवर माझे संशोधन सुरू आहे. प्रत्येक ज्योतिष्याने खगोलशास्त्राचा प्राथमिक अभ्यास तरी करावा असे माझे प्रामाणिक मत आहे. कारण ज्योतिषामधील अनेक प्रश्नांची उत्तरे खगोलशास्त्रामध्ये आहेत. ज्योतिषामधील काही प्रश्नांची उत्तरे आयुर्वेदामध्ये सुद्धा आहेत तर काही प्रश्नांची उत्तरे अध्यात्मशास्त्रामध्ये आहेत. सुदैवाने मला या विषयांमधील तज्ञ मंडळींबरोबर काम करता आले आणि अनेक प्रश्नांची उत्तरे सापडली. हे पुस्तक म्हणजे ज्योतिष शास्त्रामधील अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचे सादरीकरण आहे. ज्योतिष एक अनुभवजन्य शास्त्र आहे. जवळजवळ प्रत्येक कुंडली वेगळी, विशेष आणि ज्योतिष्यासाठी नवी असते. यामुळे मुख्यत: तर्क आणि माहितीच्या आधारेच संशोधन करण्याचा ज्योतिष्याचा प्रयत्न असतो. बऱ्याच ज्योतिष्यांची अनुमाने, निरीक्षण व प्रयोगावर आधारित असतात. ही पद्धत मानसशास्त्रासारख्या सजीव शास्त्रांशी मिळती जुळती आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर नियमांमागील कारणे माहीत असतील तर भाकितांची अचूकता आणि ज्योतिष्याचा आत्मविश्वास दोन्ही दुणावतात. बऱ्याचदा ज्योतिषी आपली भाकिते आपल्या अनुभवांवर किंवा इतरांनी सांगितलेल्या नियमांवरून करतात. पण ज्यावेळी भाकिते चुकतात तेव्हा ती का चुकली याचे कारण त्यांना सापडत नाही. मग ते अशी उदाहरणे शोधतात ज्यामध्ये त्यांना त्यांच्या चुकीचे कारण सापडेल. त्यामुळे मुख्यत: हा सगळा प्रवास प्रयोगांवर आधारित राहतो. काही ज्योतिषी सांख्यिकीय शास्त्राचा उपयोग करतात. हा मार्ग तसा अवघड आणि वेळकाढू आहे. कारण तेवढ्या कुंडल्या जमवणे आणि त्यांची छाननी करणे हे सोपे काम नाही. या पुस्तकाचा मुख्य उद्देश तर्कशुद्ध मार्गाने भविष्य सांगणे हा आहे. या योगे हे शास्त्र वेगवेगळ्या कुंडल्यांकरिता आणि परिस्थितीमध्ये उपयोगात आणता येईल. दुसरा उद्देश म्हणजे हा विषय समजायला सोपा व उपयोगात आणायला सहज करून त्याची अचूकता वाढवता यावी. माझी अशी धारणा आहे की हा ग्रंथ वाचल्यानंतर आपली ज्योतिष शास्त्राबद्दलची समजूत निश्चितच वाढेल आणि आपल्याला ते सहज वाटू लागेल. आपण हे ज्ञान आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीशी सुसंगत करू शकाल. मी आपल्याला आलेल्या अनुभवांची आणि आपल्या अभिप्रायाची आतुरतेने वाट पहात आहे. आपल्या सर्वांनी मिळून ज्योतिष हे एक शास्त्र आहे हे सिद्ध करणे आवश्यक आहे आणि सर्वांच्या प्रयत्नांशिवाय हे साध्य होणे अवघड आहे.