विविध दिवाळी अंकांतून वाचकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या ललित कथा लिहिणाऱ्या लेखिका म्हणून सारिका कुलकर्णी प्रसिद्ध आहेतच. साप्ताहिक मार्मिकमध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या बे दुणे पाच या लेखमालेतून त्या, विनोदी लिखाण देखील तितकंच उत्तम करू शकतात हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. सारिका कुलकर्णीच्या लेखणीतून उतरलेला विनोद हा अस्सल मध्यमवर्गीय मराठी मातीत जन्मलेला आहे. तो ओढूनताणून आणलेला नाहीये, तो खुलविण्यासाठी थिल्लरपणाची रासायनिक खते वापरली नाहीयेत, तो बहरण्यासाठी सवंगतेची कीटकनाशके फवारली नाहीयेत. आजच्या पिढीचा शब्द वापरायचा तर त्यांचा विनोद अगदी ऑरगॅनिक आहे. सामान्य माणसाच्या रोजच्या आयुष्�... See more
विविध दिवाळी अंकांतून वाचकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या ललित कथा लिहिणाऱ्या लेखिका म्हणून सारिका कुलकर्णी प्रसिद्ध आहेतच. साप्ताहिक मार्मिकमध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या बे दुणे पाच या लेखमालेतून त्या, विनोदी लिखाण देखील तितकंच उत्तम करू शकतात हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. सारिका कुलकर्णीच्या लेखणीतून उतरलेला विनोद हा अस्सल मध्यमवर्गीय मराठी मातीत जन्मलेला आहे. तो ओढूनताणून आणलेला नाहीये, तो खुलविण्यासाठी थिल्लरपणाची रासायनिक खते वापरली नाहीयेत, तो बहरण्यासाठी सवंगतेची कीटकनाशके फवारली नाहीयेत. आजच्या पिढीचा शब्द वापरायचा तर त्यांचा विनोद अगदी ऑरगॅनिक आहे. सामान्य माणसाच्या रोजच्या आयुष्यातील घटना, सण-उत्सव, त्यातील गमती, विसंगती ह्यांचं सूक्ष्म अवलोकन आणि त्यावर लेखिकेने केलेली मार्मिक नर्मविनोदी मल्लिनाथी वाचकांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आणते आणि बहुतेक सर्वच लेखांचा समारोप करताना त्यांनी केलेलं भाष्य वाचकांना अंतर्मुख करायला लावते हेच या पुस्तकातील लेखांचे यश आहे. मराठी साहित्यात सकस विनोदी लिखाणाला वाचकांकडून मागणी खूप असली तरी त्यामानाने पुरवठा अगदीच कमी आहे. विनोदी लिहिणाऱ्या लेखिकांची तर अक्षरशः वानवाच आहे. या पार्श्वभूमीवर दर्जेदार, निर्विष विनोदाच्या शोधात असणारे मराठी वाचक, सारिका कुलकर्णीींच्या 'बे दुणे पाच' या लेखसंग्रहाचे जोरदार स्वागत करतील अशी आशा आहे. --- सॅबी परेरा