खंड 1 - खंड -2 भारत स्वतंत्र झाल्यानंतरच्या पहिल्या अठ्ठावीस वर्षांच्या (१९४७ ते १९७५) अत्यंत महत्त्वाच्या अशा कालखंडाचा समग्र राजकीय इतिहास सदर ग्रंथात दस्तावेजांसह ग्रथित झाला आहे. या काळात राजकारणावर जवाहरलाल नेहरू प्रणित आणि नंतर इंदिरा प्रणित काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्व पक्ष, विशेषतः सोशलिस्ट आणि कम्युनिस्ट पक्ष, जोमाने उतरले होते परंतु त्यांच्या पदरी निराशाच पडली. पुढल्या दशकात सत्ताधारी काँग्रेसबाबत कोणती भूमिका घ्यावी ? मर्यादित सहकार्याची की कट्टर विरोधाची ? या दुविधेत सोशालिस्ट आणि कम्युनिस्ट पक्ष अडकले. त्या काळात धर्माधिष्ठीत राजकारण करणाऱ्या प�... See more
खंड 1 - खंड -2 भारत स्वतंत्र झाल्यानंतरच्या पहिल्या अठ्ठावीस वर्षांच्या (१९४७ ते १९७५) अत्यंत महत्त्वाच्या अशा कालखंडाचा समग्र राजकीय इतिहास सदर ग्रंथात दस्तावेजांसह ग्रथित झाला आहे. या काळात राजकारणावर जवाहरलाल नेहरू प्रणित आणि नंतर इंदिरा प्रणित काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्व पक्ष, विशेषतः सोशलिस्ट आणि कम्युनिस्ट पक्ष, जोमाने उतरले होते परंतु त्यांच्या पदरी निराशाच पडली. पुढल्या दशकात सत्ताधारी काँग्रेसबाबत कोणती भूमिका घ्यावी ? मर्यादित सहकार्याची की कट्टर विरोधाची ? या दुविधेत सोशालिस्ट आणि कम्युनिस्ट पक्ष अडकले. त्या काळात धर्माधिष्ठीत राजकारण करणाऱ्या पक्षांना नाममात्र जनाधार होता. प्रमुख आणि प्रज्ञावंत राजकीय नेते या नात्याने मधु लिमये या काळात सक्रिय होते. भाषावार प्रांतरचना आणि प्रादेशिक अस्मिता हे मद्दे ऐरणीवर आणून विरोधी पक्षांनी काँग्रेसला आव्हान दिले. जयप्रकाश नेहरू चर्चा, सोशलिस्ट पक्षातील फाटाफूट, राममनोहर लोहियांच्या नव्या पक्षाची स्थापना, प्रसोपा आणि संसोपा यांच्यातील दुरावा, जयप्रकाशांचा राजकीय संन्यास आणि लोहियांबरोबरचे मतभेद इत्यादी बाबींचा सखोल परामर्श लिमये घेतात. चीनच्या आक्रमणानंतर सर्व बिगर काँग्रेस पक्षांची मोट बांधून १९६७ ची सार्वत्रिक निवडणूक लढविण्याची व्यूहरचना लोहियांनी केली, त्यातून उत्तर भारतात काँग्रेस पराभूत झाली. पण राज्याराज्यांमधली संयुक्त विधायक दलांची सरकारे राजकीय पक्षांच्या आणि नेत्यांच्या तत्त्वशून्य सत्तालालसेपायी गडगडली. या काळाचा हा इत्थंभूत इतिहास.